बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Pankaja Munde | माजलगावमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना आमदार पंकजा मुंडे यांचे भाषण चांगलंच चर्चेत आलं आहे. ‘मला कधीच वाटलं नाही की घड्याळाचा प्रचार करावं लागले’, मुंडेंच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ” मी राजकारणातच काय जीवनामध्येच जो दिवस उजाडला त्याचा विचार करते, जो गेला त्या दिवसाचा फार विचार मी करत नाही. आपल्या हातात ते नाही. झाल्या त्या गोष्टी जिव्हारी लावून मग कुढत बसणं माझ्या हातात नाही. २०१९ ला मी पडले तेव्हा दुसऱ्या क्षणी मी कामाला लागले.
लोकसभेत माझा पराभव झाला तर लगेच मी लोकांना भेटून त्यांनी मला एवढं मतदान केलं त्याबद्दल मी आभार मानायला गेले. आता ते दुर्दैवं माझं, जिल्ह्याचं की तुमचंय की काय माहिती नाही, की आपल्याला त्या उंचीवर जायचं होतं, ती संधी होती ती नाही मिळाली.
पण त्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग किंवा सूडाची भावना अजिबात नाही. कारण, मी सांगितलं की बीड जिल्हा माझं अंगण आहे. माझं वय लहान जरी असलं तरी या बीड जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीकडे बघताना मी मातृत्वाच्याच दृष्टीतून बघते.
तेव्हा माझ्या मनात कोणतीही कोप भावना येत नाही. मी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करायला आले की, महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रकाशदादा सोळंके यांना प्रचंड मताने विजयी करा “, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
त्या पुढे म्हणाल्या, ” याशिवाय आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे पक्ष. खरंतर मला कधीच वाटलं नाही की, घड्याळाचा प्रचार मला करावा लागेल. कारण महाराष्ट्रात नव्हे तर बीडमध्ये अशी युती होवू शकते, असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं. परंतु आता झाली आहे. कारण घटना तशा घडल्या. इतिहासात घडल्या नाहीत तशा घटना घडल्या.
एका पक्षाचे दोन पक्ष झाले राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आणि त्यांचा एक एक भाग जो एकप्रकारे पक्षच सोबत घेवून सत्ता स्थापन केली मोदींनी कारण, महाराष्ट्रात येणाऱ्या काळातही महायुतीची सत्ता स्थापन करायची आहे. राष्ट्रप्रथम त्यामुळे आम्हाला मोदींचा आदेश मान्य आहे आणि आम्ही युतीही स्वीकारली आणि आम्ही रुळलो सुद्धा”, असेही पंकजा मुंडेंनी म्हंटले आहे.