ऊसतोड कामगारांच्या बैठकीसाठी धनंजय मुंडें यांना आमंत्रण देऊन त्यांच्यावर जबाबदारी द्यावी : पंकजा मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  पंकजा मुंडेंनी आज झालेल्या साखर संघाच्या बैठकीत ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने मंत्री धनंजय मुंडे यांना बोलवावे आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीला पंकजा मुंडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा ऊसतोड कामगारांचा कोयता चालणार नाही असा इशारा पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आला. आज साखर भवनात राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. राज्यात सुरु असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपातील मागण्यांवर चर्चा या बैठकीत करण्यात आली. पंकजा मुंडे यांनी या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही बोलावून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याची मागणी केली. साखर संघाच्या बैठकीत पंकजा मुंडेंनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अश्या सूचना केल्या.

पंकजा मुंडेंनी केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे

राज्यातील तमाम ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ करण्यात यावी. ही वाढ सन्मानजनकच देण्यात यावी. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचा असावा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना विमा कवच देण्याची जबादारी राज्य सरकार व कारखान्याकडून घेण्यात यावी.

सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात याव्या. एक समिती भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत.

या दोन्ही समितीने आपले म्हणणे लवादासमोर मांडावे व त्यावर चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे.

हा संप मजुरांच्या हक्कांसाठी आहे. कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही.ऊसतोड कामगारांच्या संपात काही जणांकडून उगाच हस्तक्षेप करण्यात येत आहे. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे मत पंकजा मुंडेंनी साखर संघाच्या बैठकीत मांडले.