पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मिळाली 11 कोटींची थकहमी !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – साखर कारखान्याच्या विषयात राजकारण आणणार नसल्याचे सांगत मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील पंकजा मुंडेच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी द्यावी, अशी आग्रही केली होती. त्यानंतर राज्य सरकारने मागणी मंजूर केली आहे. शेतकरी व कर्मचार्‍यांच्या हितासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या कारखान्याला मदत करावी अशी मागणी केली होती.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची धुरा भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्मचार्‍यांनी पगारासाठी उपोषण केले. तसेच एफआरपी प्रमाणे पैसे मिळाले नसल्याने कारखाना आर्थिक अडचणीत आला असल्याचे समोर आले होते. महाविकास आघाडीने राज्यातील 32 साखर कारखान्यांना थकहमी देण्याचा निर्णय घेतला असून त्यात वैद्यनाथ साखर कारखान्याला 10 कोटी 77 लाख रुपयांची थकहमी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव करून धनंजय मुंडे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली.

पालकमंत्री व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आग्रही मागणी केली. राजकीय विरोध बाजूला ठेवून धनंजय मुंडे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ‘ दिवंगत गोपीनाथ मुंडे व पंडित अण्णा मुंडे या दोघांनी कष्टाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करून कारखान्याला आघाडीवर नेले होते. मात्र पंकजा मुंडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर पाच वर्षांतच कर्मचार्‍यांवर थकीत पगारासाठी उपोषणाची वेळ आली हे दुर्दैव. आता तरी गळीत हंगाम सुरू करून परिसरातील उसाचे गाळप करावे. शेतकरी व कर्मचार्‍यांचे हित जोपासून वैद्यनाथ सांभाळा असा टोलाही धनंजय यांनी लगावला आहे.