पंकजा मुंडे यांचे आज औरंगाबादेत उपोषण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – मराठवाड्यातील पाणी पुरवठा आणि अनुशेष दूर करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे या सोमवारी विभागीय आयुक्तालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहे. या उपोषणात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहे.

परळीमध्ये झालेला दारुण पराभव, त्यानंतर भाजपामधील संदोपसंधी यामुळे चर्चेत राहिलेल्या पंकजा मुंडे आता पुन्हा एकदा सक्रीय होत आहेत. आज सकाळी १० वाजल्यापासून त्या विभागीय आयुक्तालयाबाहेर उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण लाक्षणिक असणार आहे.

मराठवाड्याचा अनुशेष दूर व्हावा. मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासाठी १ हजार कोटी रुपये द्यावेत. औरंगाबाद येथील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ६५० कोटी रुपये द्यावेत अशा मागण्यांसाठी हे उपोषण असणार आहे.

पुढील महिन्यात राज्य शासनाचा अर्थसंकल्प अजित पवार सादर करतील. त्यात मराठवाड्यासाठी राज्य शासन काही घोषणा करण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन त्याचे श्रेय घेण्यासाठी हा उपोषणाचा घाट घातला जात असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राज्य शासनाने ही काही घोषणा केली तर आपल्यामुळे ही घोषणा केली, असे सांगता येईल व अशी काही तरतुद केली नाही तर राज्य शासनाचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टिका करता येईल, असा दुहेरी हेतू या उपोषणामागे असल्याचे सांगितले जात आहे.