3 तासात पंकजा मुंडे यांच्या फ्लेक्सवर झळकलं ‘कमळ’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या होणाऱ्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असून त्या पक्षाला सोडचिट्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी मी सर्व गोष्टींचा खुलासा करेल असे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. याबाबतच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या सुरु आहे. यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्स वर पंकजा मुंडे यांच्या फोटोसह अनेक नेत्यांचे फोटो दिसले होते. मात्र त्यावरून भाजपचे कमळ चिन्ह गायब असल्याचे पहायला मिळाले होते. मात्र अवघ्या तीन तासात भाजपचे कमळ असलेले पोस्टर संपूर्ण परळीमध्ये पहायला मिळाले.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या राज्यातील नेतृत्वाबाबत अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे कारण खडसे यांना भाजपने उघडपणे डावलल्याचे पहायला मिळाले होते. त्यापाठोपाठ भाजपने विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे विधानसभेचे तिकीट कापल्याने हे नेते सुद्धा पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यापेक्षाही जास्त म्हणजे पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव त्यामुळे पंकजा मुंडे उद्या नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

उद्याच्या मेळाव्याबाबत परळीमध्ये जोरदार तयारी सुरु होती त्यासाठी सर्वत्र पोस्टर देखील लावण्यात आले होते. मात्र त्यावर कोठेही भाजपचा उल्लेख नव्हता किंवा भाजपचे झेंडेही नव्हते. मात्र अवघ्या तीन तासात भाजपचे कमळ असलेले पोस्टर्स परळीत झळकल्याने पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराच्या चर्चा काहीशा कमी झाल्या आहेत.

गोपीनाथ गड हे राजकीय व्यासपीठ नाही म्हणून पक्षाचा किंवा चिन्हाचा उल्लेख केला नसल्याचे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले होते. तर एवढे दिवस थांबलाय आता उद्यापर्यंत थांबा असे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिले होते. त्यामुळे नेमकं उद्या पंकजा मुंडे आपल्या भाषणामधून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com