पंकजा मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी दौर्‍यात केला बदल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –परतीच्या पावसाने राज्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते दोन दिवसांपासून बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. आता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही आपला दौरा जाहीर केला आहे. मात्र, याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही दौरा असल्याने पंकजा यांनी आपल्या दौर्‍यात बदल केला आहे. त्या उद्या नांदेडचा दौरा आटोपून फडणवीस यांच्या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. कोरोनाची स्थिती पाहता पंकजा यांनी कार्यकर्त्यांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी देखील सूचना केल्या आहे.

या संदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे की, माझा नांदेड-हिंगोली-परभणी-बीड असा अतिवृष्टी पाहणी दौरा ठरला होता, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचाही मराठवाड्यात दौरा असल्याने मी 20 तारखेला नांदेड जिल्ह्याचा दौरा संपवून त्यांना जॉईन होईन.

आपल्या दौर्‍याबाबत पंकजा मुंडे यांनी सांगितले की, 20 आणि 21 ऑक्टोबरला मराठवाड्यातील अतिवृष्टी पाहणी दौरा करून 22 तारखेला सकाळी औरंगाबाद येथून शहागड, गेवराई, बीड, वडवणी, तेलगाव, सिरसाळा मार्गे गोपीनाथ गड दर्शन व परळी निवासस्थानी मुक्कामासाठी येईन.

कोरोना महामारीचे संकट अजूनही कायम असल्याने दौर्‍यात सहभागी होणार्‍या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, कार्यकर्त्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून भेटावे. सर्वांनी मास्क घालून यावे तसेच सोशल डिस्टन्स राखावे. सर्दी, खोकला, ताप असल्यास सहभागी होऊ नये. तुमची काळजी मला आहे म्हणून हे नियम माझ्यासाठी तुम्ही पाळा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

फडणवीस आणि दरेकर यांचे पाहणी दौरे
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा अतिवृष्टीचा दौरा सुरू होणार आहे. आज ते पुणे, बारामती येथे पाहणी करणार आहेत. तर विरोधी पक्ष नेते दरेकर हे फडणवीस यांच्यासोबत असणार आहेत. दरेकर आजपासून 22 ऑक्टोबर पर्यंत चार दिवस पुणे, सोलपूर सांगली व सातारा जिल्ह्यात दौरा करतील.