पंकजा मुंडेंसह ‘या’ नेत्याने नावापुढे चौकीदार शब्द लावला नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार या शब्दाचा वापर केला आहे. आता राहुल गांधींच्या या टीकेला सोशल मीडियावरून नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं आहे. मोदींनी त्यांच्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला आाहे.

त्यांनी नावापुढे हा शब्द लावल्यानंतर भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी, खासदारांनी तसेच इतर नेत्यांनी त्यांच्या नावापुढे चौकीदार हा शब्द जोडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मोदींच्या समर्थकांनीदेखील त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आणि मोदींना सर्मथन दिले. यानंतर ट्विटरवर हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आल्याचे दिसून आले. मात्र ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्या नावापुढे चौकीदार शब्द लिहिला नसल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नावापुढे चौकीदार शब्द जोडल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मोदींना पाठिंबा दाखवत लगेचच ट्विटरवर आपल्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नावापुढे चौकीदार शब्द लिहला. यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेकांनी हेच केले. मुख्य म्हणजे पातळीवरही हाच ट्रेंड दिसला. मोदी आणि भाजपा समर्थकांसह इतर अनेक मंत्र्यांनी मोदींचे हे कॅम्पेन फाॅलो केलं. परंतु पंकजा मुंडे यांनी अद्याप आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लिहला नाही असं दिसत आहे.

ज्या मंत्र्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्द लावला त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, अन्न आणि पुरवठा मंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, पर्यावरणमंत्री प्रवीण पोटे आदींचा समावेश आहे. परंतु अद्याप आपल्या नावापुढे चौकीदार शब्द न जोडणाऱ्यांमध्ये पंकजा मुंडेंसह अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार आदी नेते आहेत.