…म्हणून मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय : पंकजा मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी स्वतःला आधीच सिद्ध केलं आहे, मात्र पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी नाराज नाहीच. मला आता स्वतःला पाहायचं आहे. मला आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करायचं आहे. एनजीओच्या माध्यमातून काम करायचं आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली, त्यामागे कोणतीही अस्वस्थता नव्हती. मी नाराज नव्हते, अस्वस्थ नव्हते. माझ्या मनात खदखद नव्हती. मात्र 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर ज्या-ज्या वावड्या उठल्या त्यामुळे मी अस्वस्थ झाले. मी भाजपा सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून गेलेली नाही. कोअर कमिटीमध्ये मी राहणार नाही हा निर्णय मी घेतला. कारण मी पॉवरगेम खेळते आहे, मला विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे अशाही काही चर्चा रंगल्या होत्या. त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी मी हा निर्णय घेतला. ‘

पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी मुंबईत गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे कार्यालय सुरू करणार असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केली होती. तसेच मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणीही त्यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/