‘मी पुन्हा येईन’चा त्रास फडणवीसांना आगामी 5 वर्ष होणार : पंकजा मुंडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विधानसभा निकालानंतर मौन बाळगलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरच्या (१२ डिसेंबर) भाषणात इतक्या दिवसांची भडास काढली. त्यांच्या भाषणाने राज्याच्या राजकारण पेटलं आहे. त्यामुळे, भाजपमध्ये अंतर्गत खलबतं सुरु असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘जनतेच्या मनातली मुख्यमंत्री या वाक्याने गेली ५ वर्ष छळलं होतं. जे मी स्वतः कधीच बोलले नाही. तसेच काहीसे फडणवीसांच्या बाबतीतही घडलं. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या ‘मी पुन्हा येईल’ या वाक्यामुळे त्यांना टीका सहन करावी लागली आणि पुढची पाच वर्ष त्यांना ते छळणार आहे,’ असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं.

त्रास सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. पण काही गोष्टींमुळे अस्वस्थ मात्र आहे. माझ्या ट्वीटर हँडलवर कमळ किंवा भाजप कधीच नव्हतं. काही लोकांनी उगाच त्या गोष्टीचा बाऊ केला. कोणतेही कारण नसताना मी पक्ष सोडणार, बंड करणार अशा चर्चा रंगवल्या गेल्या ज्यामुळे मी अस्वस्थ आहे. तसेच मी विरोधीपक्ष नेते पद मिळविण्यासाठी किंवा अन्य पद मिळविण्यासाठी दबाव निर्माण करत आहे, असं सांगितलं जात होतं. माझ्याकडे कोअर कमेटीचं सदस्यपद हे एकच पद होत. मात्र १ ते १२ डिसेंबरच्या दरम्यान जे घडलं त्यामुळे मीच ते पद सोडलं. त्यामुळे मला त्या निर्णय प्रक्रियेचा भाग राहायचं नाही, ‘ असेही पंकजा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच, पंकजा पुढे म्हणाल्या कि, ‘दिल्लीचा पाठिंबा असल्याने मी बंड करते, ह्या चुकीच्या बातम्या आहेत. मी दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केली नाही. मला त्याची गरजही नाही. मला पुन्हा शुन्यातून नवीन काही निर्माण करायचं आहे. राजकारणात यायची माझी इच्छा नव्हती. लोकांच्या पाठिंब्यामुळेच मी राजकारणात आले.’

‘मी गोपीनाथ मुंडें प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच काम करणार आहे. कारण शेवटी काम करण्याचं स्वातंत्रही महत्त्वाचं असतं. तसेच ज्यांचं अस्तित्वच पणाला लागलं त्यांच्याविषयी फार अपेक्षा ठेवता येत नाही. पक्ष मुठभरांचा होऊ नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. वंजारी समाजाला जास्त तिकीटं द्यायला पाहिजे होती, असेही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध आहेत. ते संबंध राजकारणापलीकडे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/