एकनाथ खडसे भाजप सोडणार ? पंकजा मुंडेंनी प्रथमच सोडलं मौन, म्हणाल्या…

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्त देखील काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मला वाटत नाही खडसे साहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे समर्थक समजले जातात. पण मुंडे यांच्या निधनानंतर खडसेंना पक्षात डावलण्याचे प्रकार होऊ लागले. याबाबत खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरुन पक्षांतर्गत कुरघोड्यांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा पंकजा मुंडेही पक्षाच्या सक्रिय कार्यातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, मागील महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिल्याने, त्या पुन्हा मुख्य प्रवाहात दिसून आल्या.

आता पंकजा मुंडे या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करत आहेत. त्यावेळी वार्ताहरांनी मुंडे यांना एकनाथ खडसे यांच्या संभावित राष्ट्रवादी प्रवेशावर प्रश्न विचारला, त्यावरती पंकजा मुंडे म्हणाल्या की, चर्चा चर्चा असतात जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटतं नाही खडसेसाहेब पक्ष सोडण्याचा विचार करतील, असे त्यांनी सांगितलं.

नाथाभाऊ पक्ष सोडणार नाहीत
भाजपचे नुकसान होईल असा निर्णय खडसे घेणार नाहीत. पुढील काही दिवसात ते पुन्हा सक्रिय होतील ते कुठेही जाणार नाहीतर. पण जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेत त्यांचा नक्कीच हिरमोड होणार आहे. खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीस उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात सक्रिय दिसतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

खडसे पक्षांतर करणार नाही – देवेंद्र फडणवीस
एकनाथ खडसे आमचे जेष्ठ नेते असून, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. त्यांना राजकारण नीट कळते. यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. तर, असे मुहूर्त रोज सांगितले जातात, त्यावरती मी बोलणार नाही, असे सांगत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर फडणवीस यांनी भाष्य करणे टाळलं.