बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पार्थ पवार यांनी केलेल्या पहिल्या भाषणाची चर्चा राज्यभरात होताना दिसली. यानंतर आता भाजपाच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पार्थ पवार यांना भाषण येत नसले तरीही ते भाषण न करताही नेते बून शकतात असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
पाटोदा तालु्क्यातील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला. इतकेच नाही तर, चांगले भाषण करणाऱ्या धनंजय मुंडे यांना मात्र आपल्या पेक्षा लहान बहिणी वर टीका करताना काहीच वाटत नाही का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
आपल्या भाषणात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला लोकांनी विचारलं पार्थ पवार यांच्या भाषणावर तुमचं काय मत आहे? मी त्यांना म्हटलं नवीन नवीन भाषणात चुकतो तो माणूसच. काही लोक तर बिना भाषणाची पण नेतेगिरी करतात. मला वाटलं कदाचित तेही बिना भाषणाचे चांगले नेते असू शकतात.” असं म्हणतं पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका केली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “माझ्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या माणसावर मी टीका करणं बरोबर आहे का ? आपल्या पाठीवर जन्म घेतलेल्या बहिणी वर टीका करणे बरोबर आहे का तुम्हीच सांगा. माझ्या पाठीवर जन्म घेतलेल्या माझ्या बहिणीला पात्रता विचारणाऱ्या भावाला आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देण्याची क्षमता ही माझ्यामध्ये आणि धसांमध्ये असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘पवार कुटुंबाकडून आमच्या भावाने काहीतरी शिकले पाहिजे’
धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना पंकजा म्हणाल्या की, “आमच्या बापाने संस्कार सगळ्यांवरच केले. भावाने आता दुसरे संस्कार स्वीकारले आहे. ज्या पवार कुटुंबीयांचे तुम्ही नेतृत्व स्वकारले त्या कुटुंबात सगळे एकच आहेत. बहिण भाऊ एकमेकांबरोबर फोटो काढतात. एकमेकांच्या ननंद भावजय कौतुक करतात. पण यातून आमच्या भावाने थोडेफार शिकले पाहिजे असा टोला पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. तुम्ही विचाराने गेलात तुम्ही विचाराने विरोध करा तुमच्या अचाराने विरोध करू नका.” असंही पंकजा म्हणाल्या.