‘हीच ती वेळ’ पंकजा मुंडेच्या समर्थकांची सोशल मीडियावर ‘मोहीम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचा प्रयत्न फोल ठरल्यानंतर भाजपामध्ये हादरा होऊन कंपने जाणवू लागली आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सातत्यानं स्वपक्षीयांवर टीका करत आहेत. त्यात आता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून तसे मार्ग बदलण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ट्विटर बायोही बदलला आहे. गेल्या काही दिवसांत पंकजा यांनी शिवसेनेचे कौतुक करणारे ट्विट केले आहेत. त्यामुळे पंकजा शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘हीच ती वेळ’ अशी मोहीम सुरु केली आहे.

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर मार्ग बदलण्याचे संकेत दिले. यानंतर ‘हीच ती वेळ’ या टॅगलाईन खाली सोशल मीडियावर पंकजा मुंडे समर्थकांकडून शेअरिंग सुरु आहे. पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रविवारपासून सुरु झाली आहे. दरम्यान, आज सकाळी त्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी मातोश्रीला कधीही अंतर दिले नाही. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजप आमने-सामने होते. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे बहिण असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात परळीमधून शिवसेनेचा उमेदवार दिला नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रीतम मुंडे यांच्या बाजूने होते.

लोकसभेनंतर झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे हा पराभव झाल्याची चर्चा असून, त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत. येत्या 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी मोठा निर्णय घेऊन राजकीय भुकंप घडवणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like