पंकजा मुंडे विधान परिषदेवर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार असून पक्षाकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत घेतलेल्या या निर्णयावर पक्षाच्या सर्व नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे समजते. यावर आजपासून होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याचं म्हंटल जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहे. इतर पक्षदेखील या रिकाम्या जागा भरण्यासाठी हालचाल करत आहेत. दरम्यान, भाजपाकडे असलेल्या संख्याबळामुळे काही उमेदवारांना विधान परिषदेवर सहज पाठवता येणार आहे. यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. कारण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचा मराठवाड्यात जम आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी त्या एक आहे. अनेक वर्षांपासून आमदार आणि राज्यात पाच वर्षे मंत्री असल्यानं त्यांना संसदीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा पक्षाला विधान परिषदेत होणार असल्याचं भाजपाच म्हणणं आहे,.

दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा यांचा दारुण पराभव झाला. त्यांचा चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पंकजांना पत्करावा लागला. या निवडणुकीनंतर पंकजा पक्षावर नाराज होत्या, पक्षातील नेत्यांनीच दगाफटका केल्याची भावना त्यांची होती. त्यांनतर पक्षातील नाराजांसोबत भगवानगडावर समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडण्याची घोषणाही केली होती. पंकजांच्या या नाराजीची गंभीर दखल घेतल्याचं सध्याच्या घडामोडींतून दिसतं आहे. त्यामुळे त्यांना ही संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं समजते.