धनंजय मुंडेंचा पंकजांवर गंभीर आरोप, एखंडे खूनप्रकरण दडपण्याचा प्रयत्न

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मीरा ऐखंडे मृत्यू प्रकरण दाबण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी प्रयत्न केले, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्यभर गाजत असलेल्या माता बालक मृत्यू प्रकरणाची दखल घेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी एखंडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर माजलगाव महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषद घेतली. या वेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक, भानुदास डक, जयदत्त नरवडे, मनोज फरके, चंद्रकांत शेजूळ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, मीरा एखंडे या प्रसूतीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संपूर्ण माहिती असताना देखील डॉक्टरांनी केलेल्या दुर्लक्षामुळे तिचा व तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या नंतर बळजबरीने नातेवाईकांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या व घाईघाईने ऐन मध्यरात्री शवविच्छेदन करून डॉ. साबळे यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या मृत्यूस सर्वस्वी कारणीभूत असलेल्या डॉ. साबळे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, आणि एखंडे कुटुंबीयाला राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत द्यावी, यासाठी आजच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून एखंडे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असून हा प्रयत्न हाणून पडण्याचे काम आपणा सर्वांना करायचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.