पंकजा मुंडेंनी पदाचा गैरवापर केला – बजरंग सोनवणे

बीड : पोलिसनामा ऑनलाईन

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच बीडच्या पालकमंत्र्यांनी स्वतःचा पदाचा गैरवापर करून सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला पुन्हा स्थगिती दिली आहे . तसेच न्यायालयाच्या निर्णयाचाही अवमान केला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. याप्रकरणी आपण पुन्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बीड-लातूर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव स्पष्ट दिसू लागल्यामुळेच बीडच्या पालकमंत्र्यांनी स्वतःचा पदाचा गैरवापर करून सहा जिल्हा परिषद सदस्यांच्या अपात्रतेला पुन्हा स्थगिती दिली आहे . मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशोक जगदाळे यांचा विजय निश्चित होईल आणि मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असे सोनवणे यांनी म्हटले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अपात्रतेला स्थगिती दिल्यामुळे भाजपला या निर्णयाचा फायदा होणार आहे.

काय आहे प्रकरण

बीड जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांना अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळी पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्थगिती दिली होती मात्र स्थगितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द ठरवत याप्रकरणी स्थगिती देता येणार नाही तातडीने निर्णय द्या असा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही खंडपीठाचा हा आदेश कायम ठेवला होता त्यात या सदस्यांना कोणत्याही मतदानात भाग घेता येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते.

सरकारचा पक्षपातीपणा

ऐन विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर बीड नगर पालिकेतील 11 सदस्यांना अपात्र करण्याचा सरकार चा निर्णयही पूर्णपणे पक्षपाती असल्याची टीका बजरंग सोनवणे यांनी केली आहे. अनेक महिन्यापासून हे अपील प्रलंबित असतांना आजच हा निर्णय कसा दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.