पंकजा मुंडेंच्या वृत्ताबाबत भाजपकडून मोठा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे सरकार असताना पंकजा मुंडे यांच्याकडे महिला-बाल कल्याण आणि ग्रामविकास खात्याचा पदभार होता. यंदाच्या विधानसभा निवडणुक ही त्यांच्यासाठी अतिशय चुरशीची ठरली. शेवटपर्यंत कोण बाजी मारणार हे सांगणे कठीण होते. अखेर या बहीण भावाच्या लढाईत धनंजय मुडेंनी बाजी मारली आणि पंकजा मुडेंना हार पत्करावी लागली. हक्काच्या परळी मतदारसंघातून झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून फेसबुकवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता आहे. असे म्हटल्याने पंकजा मुंडे या भाजप सोडण्याच्या मार्गावर आहेत की काय, अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यात भर म्हणून पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भाजपासंदर्भातली ओळखही काढून टाकली असल्याने चर्चेला अधिक वेग आला आहे.

अखेर या विषयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “पंकजा मुंडे या भाजपाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. छोट्या पातळीपासून काम करत त्या मंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांचं पंकजा मुंडेंशी बोलणं झालं असून, त्या भाजपाची साथ सोडणार नाहीत. त्यांच्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबायला हव्यात”, असे म्हणत पंकजा मुंडे या भाजपा मध्येच आहेत, बाहेर निव्वळ अफवा पसरत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडेंच्या मनात अखेर आहे तरी काय असा सवाल उभ्या महाराष्ट्राला पडला असून त्या शिवसेनेत जाण्याची चर्चा देखील आहे. परंतु यास चंद्रकांत पाटील यांनी खोडले असून ते म्हणाले की, खरंतर कोणताही राजकीय नेता असो पराभवानंतर तो आपल्या पराभवाचं विश्लेषण जनतेसमोर करत असतो. याबद्दल तो आत्मचिंतन करून आपण कुठे कमी पडलो याचा देखील आढावा घेत असतो. १२ तारखेला गोपीनाथ गडावर दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. यासाठी फक्त राज्यभरातील नव्हे तर देशातून त्यांचे अनेक नेते गोपीनाथ गडावर येत असतात, आम्हीही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित असतो. त्यामुळे पंकजा मुंडे वेगळा विचार करत असून भाजपला रामराम ठोकतील असा अर्थ काढणं पुरेपूर चुकीचं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असून या निव्वळ अफवा आहेत असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com