पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून ‘संजय काकडे मुर्दाबाद’च्या घोषणा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या तीव्र निषेध करण्यात आला. ‘संजय काकडेचं करायचं काय खाली मुंडके वर पाय.. मुर्दाबाद..मुर्दाबाद..संजय काकडे मुर्दाबाद’च्या घोषणा देत बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. दोन दगडावर हात ठेवणारे संजय काकडे संधी साधू असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली. तर महिला पदाधिकारी संगीता धसे यांनी संजय काकडे यांनी अवकातीत रहावे असा सज्जड दमच दिला आहे. यावेळी भाजप कार्य़कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांनी संजय काकडे यांना मोठं केलं, त्याचं भान त्यांना राहिले नाही. ओळख साहेबांनी दिली ते संजय काकडे ग्रामपंचायत निवडणूक लढवली असती तरी त्यांना ओळखलं असतं. संजय काकडे कोणत्या पक्षाचे आहेत, हे आम्हाला माहिती आहे. रात्री एक आणि सकाळी एक अशी बोलायची त्याची सवय आहे. खासदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी ते दारोदारी फिरतात, ते अजित पवारांना भेटतात, ते संधी साधू आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया संगीता धसे यांनी दिली.

काय म्हणाले संजय काकडे ?
ज्या व्यक्तीला मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे पक्षाला काही फरक पडणार नाही. पाच वर्षे मंत्री असूनही तिथल्या लोकसभेची खासदारकी कुटुंबात असूनही जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते. चाळीस वर्षे राजकारणात असूनही मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही. त्यांच्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. पंकजा मुंडे यांनी कोणालाच जवळ केलं नाही. मराठा, मुस्लीम, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळे त्या पराभूत झाल्याचे संजय काकडे म्हणाले होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/