राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन विरोधकांकडून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, वैयक्तिक बाबतीत विचार करता ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांनीच भूमिका घ्यावी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून वारंवार होत आहे. मुंडेनी राजीनामा द्यायला हरकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातल जात आहे, हे दुर्देवी आहे. राठोड प्रकरणात निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. सध्याच्या सरकारने जो पायंडा पाडला आहे, तो एका स्त्रीसाठी घातक आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली.

यावेळी पंकजा मुंडे यांनी पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे कौतुक केले आहे. राठोड यांच्यावर इतरांनीही आरोप केले होते, मग चित्रा वाघ यांचेच फोटो माॅर्फ का केले. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.