भाजप नेत्या पंकजा मुंडेंची शरद पवारांना विनंती, म्हणाल्या – ‘बीड जिल्ह्याकडे लक्ष द्या, शासनाने येथे अत्याचार करायच ठरवलंय’

बीडः पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. नुकतेच अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मयत रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का ?  असा सवाल केला जात आहे. दरम्यान याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी विनंतीही केली आहे.

एकाच रुग्णवाहिकेत 22 जणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना केली आहे. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातील आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावे की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी घटनेबद्दल संताप व्यक्त करत ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी ऑयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली. रुग्णालयाच्या डिनने मात्र स्वत:ची जबाबदारी कलेक्टरवर ढकलली आहे. कलेक्टरचे असे झाले की ते बोलूच शकत नाहीत. बीड जिल्ह्यात सध्या शासनाने अत्याचार करायच ठरवले आहे अन् अन् प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थितीत अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान याबाबत उपविभागीय अधिकारी शरद झाडके म्हणाले की, यापुढे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.

रुग्ण अन् मृतदेहांची एकाच रुग्णवाहिकेतून वाहतूक
जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते . तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जात आहे. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे.