मेळाव्यास काही तास शिल्लक असतानाच पंकजा मुंडेंनी केलं सूचक विधान

बीड : पोलीसनामा ऑनलाइन : विधानसभा निवडणुकीत परळीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. कारण या बहीण भावाच्या लढाईत अखेर बाजी कोण मारणार याबाबत सगळ्यांना कुतूहल होते. अखेर पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडेंनी पराभवाच्या छायेत ढकलले. तेव्हापासून पंकजा मुंडेंना विविध प्रश्नांनी जखडले. तसेच त्यांचा पराभव हा ठरलेला होता का? त्यांचा जाणून बुजून पराभव करण्यात आला का? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. या प्रश्नांना पंकजा मुंडेंनी अजून मोकळेपणाने उत्तर दिलेले नाही. तसेच पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहेत असेही वृत्त सगळीकडे फिरत आहे.

दरम्यान भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी उद्या १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात त्या काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष्य लागून आहे. परंतु, त्याआधी ‘ज्या राजकीय चर्चा रंगल्या आहे त्या सगळ्या चर्चांचं उत्तर उद्या मिळणार’, असं सूचक विधान पंकजांनी केलं आहे. त्यामुळे उद्या पंकजा काय बोलतात याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली होती आणि त्यात त्यांनी लिहिले होते की, १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सर्वांशी बोलायचं आहे असं सांगून नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या नाराजीच्या पोस्टमुळे पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्या बुधवारी गोपीनाथ गडावर हा निर्णायक मेळावा होणार आहे.

आज विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर आल्या आणि दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पंकजा यांनी सांगितलं की, गोपीनाथ गडावर दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येत असतात. उद्या मी सुद्धा येणार असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध चर्चांना उधाण आले आहे, त्या सर्व चर्चांना उद्या उत्तरं मिळणार आहेत असे देखील पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले आहे.

उद्या होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी शहरभर पंकजा मुंडेंचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. मात्र काही पोस्टर्सवर भाजपाचे कमळाचे चिन्ह लावण्यात आले आहे तर काही पोस्टर्सवर कमळाच्या चिन्हाचा वापर केलेला नाही. यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पंकजांनी सांगितले की हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसून तो वैयक्तिक आहे. त्यामुळे कमळाचे चिन्ह लावणे गरजेचे नाही. काही बॅनरवर कमळाचे चिन्ह आहे कारण, गोपीनाथ मुंडे आणि कमळाचं खूप जुनं नातं आहे. तसेच त्या म्हणाल्या कि सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही उद्या मिळतीलच.

तसेच पंकजा म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडेंनी अनेक लोकांना प्रेम दिले. पक्ष वगैरे बाजूला ठेऊन लोक गोपीनाथ गडावर येत असतात. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे गोपीनाथ गडावर स्वागत आहे. तसेच अनेक नेत्यांनी गोपीनाथ गडाला येण्याचे जाहीर केले असून त्यापैकी एकनाथ खडसे, महादेव जानकर, चंद्रकांत पाटील हे देखील उद्या हजर राहणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता उद्या नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Visit : policenama.com