पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यातून 38 लाखांचे साहित्य लंपास

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – परळी तालुक्यातील कौठाळी शिवारातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Vaidyanath Co-Operative Sugar Factory, Parli) स्टोअर व वर्कशॉप गोदामातून 37 लाख 84 हजार रुपयांच्या साहित्याची चोरी (Robbery) झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.22) कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. या घटनेमुळे कारखान्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊन आहे. कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे कारखाना बंद होता. याच कालावधीत ही घटना घडली आहे. ही घटना 13 ते 17 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडली आहे. या संदर्भातील माहिती स्टोअर किपर जी.टी. मुंडे यांनी कारखान्याच्या लिपिक व लीगल इंचार्ज खदिर शेख यांना सांगितले.

चोरीबाबत तब्बल दोन महिन्यानंतर काराखाना प्रशासनाला जाग आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्टोअर गोदाम वर्कशॉप मधून संगणक, मॉनिटर, 200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिलबोरिंग, ब्रास इंपेरियर, बुश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयाचे साहित्य चोरीला गेले आहे. लिपिक खदिर शेख यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.