कॉ. पानसरे हत्या प्रकरण : अमित देगवेकर जेलमध्ये 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित अमित देगवेकर याला बुधवारी ६ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवारी त्याला कसबा बावडा येथील मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते. अमित देगवेकर हा कॉम्रेड गौरी लंकेश हत्या प्रकरणातीली देखील संशयित आरोपी आहे. अमित देगवेकर हा पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी आहे.
या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने समीर पटवर्धन यांनी युक्‍तिवाद केला. देगवेकर याला ६ दिवसांच्या कोठडीची मागणी सरकारी वकिल शिवाजीराव राणे यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला ६ दिवसांची कोठडी दिली आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी  देगवेकरवरील कारवाईमुळे आजवर अटक झालेल्यांची संख्या सात झाली असल्याचे समजत आहे. कॉ. पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमित दिगवेकर याचा बंगळूर मध्यवर्ती कारागृहातून ताबा घेतला होता.
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अमित देगवेकरने शस्त्रे पुरवणे, बेळगाव येथे झालेल्या कटाच्या बैठकीस उपस्थित राहणे. बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी यापूर्वी केला होता.