मावळमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्‍का : मित्र पक्ष शेकापच्या 3 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 3 नगरसेवकांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. शेकाप हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष असल्याने आता राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. शेकापच्या पनवेल महापालिकेतील 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते के.के. म्हात्रे, शिला भगत, हेमलता रवि गोवारी आणि रवि गोवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत या 6 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. घाटाखालील तिन्ही मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शेकापची आघाडी असल्याने घाटाखालील मतदार संघातुन पार्थ पवार यांना चांगलीच मदत मिळणार होती. आता 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्‍का बसला आहे.

पार्थ पवार हे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातु असल्याने मावळ मतदार संघात पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकहाती सत्‍ता होती. आता चित्र तसे नाही. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघ जिंकणे हे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसपुढे असणार आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येवुन ठेपली असतानाच शेकाप 3 नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मावळ मतदार संघात युतीचे पारडे जड झाले आहे.