बारबालांची परेड भोवली, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – बारबालांची परेड काढणे काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांना चांगलीच भोवली असून अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्त केले असून संजय हजारे यांची काशिमीरा पोलीस ठाण्यात प्रभारीपदी बदली करण्यात आली आहे.

भालसिंग हे पूर्वीपासूनच माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी काही प्रकरणात मेहता व त्यांच्या निकटवर्तीयांना झुकते माप दिल्याने शिवसेनेच्या आमदार गीता जैन यांनी पक्षपातीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. काही प्रकरणात नागरिकांचा संताप व्यक्त झाला होता. परंतु सत्तेत असताना मेहतांचा वरदहस्त असल्याने भालसिंग यांच्या विरोधात तक्रारी होऊन देखील ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याचा आरोप तक्रारदार करत होते.

दरम्यान, सत्ताबदलानंतर भालसिंग यांना पोलीस अधीक्षक यांनी काशिमीरासारखे क्रीम पोस्टिंग म्हणून ओळखणारे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नियुक्तीनंतर भालसिंग यांनी बारबालांची चौकशीनिमित्त परेड काढल्याने त्यांच्यावर काही वर्गातून टीका झाली. आमदार गीता जैन यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली त्यामुळे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी आज (सोमवार) भालसिंग यांची उचलबांगडी करत भिवंडी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/