हिंदूंच्या धर्माचरणावर घाला खपवून घेतला जाणार नाही : हिंदू जनजागृती समिती

पोलीसनामा ऑनलाईन टीम- हिंदूंच्या धर्माचरणावर कोणी घाला घालत असेल, त्यांच्या धार्मिक कार्याला विरोध करत असतील तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे मत हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी गुरुवारी (ता.२९) व्यक्त केले. हिंदूंच्या सणांना अंधश्रद्धा मानण्यापुर्वी हा विषय विवेकी दृष्टीने हाताळल्यास अनेक समस्या सुटतील. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी प्रशासनाने गणेश मुर्ती विसर्जित करण्यासाठी नद्यांना जास्त पाणी सोडावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

गणेशोत्सव हा हिंदूच्या भावनाचा सण आहे. हिंदूच्या उत्सवात मंडळांनी मोठ्या आवाजात डिजे लावल्यास ध्वनी प्रदुषण होते. वाहत्या पाण्यात मुर्ती विसर्जित केल्यास पाणी प्रदुषण होते. अशी कारणे देत प्रशासन त्यांच्या उत्सवातील विविध धार्मिक कार्यांवर बंदी आणत असते. हिंदूच्या प्रत्येक सण उत्सवात त्यांना प्रदुषणाचे कारण देत त्यांच्यावर कोणतेही नियम लादून त्यांच्या भावना दुखावल्या जातात. पण मुर्ती पाण्यात विसर्जित केल्या नाही तरी पाणी प्रदुषण होण्याचे थांबले आहे का ? हा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला. प्रशासनाने कागदी लगद्याच्या मुर्ती वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र कागदी लगद्यामुळे पाण्याचे जास्त प्रदुषण होते हे सिद्ध झाले असल्याने हरित लवादाने शासनाच्या या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे हिंदूंच्या सणांना अंधश्रद्धा मानण्यापुर्वी हा विषय विवेकी दृष्टीने हाताळल्यास अनेक समस्या सुटतील.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. उत्सव काळात अनेक मंडळे त्यांचा गणपती नवसाला पावणारा गणपती असल्याचे दावे करत असतात. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने अशा मंडळांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या मंडळांना विरोध करणाऱ्या अंनिसच्या विरोधात आवाज उठविण्यात येईल. तसेच वेळ आल्यास त्यांच्या विरोधात आंदोलनही छेडण्यात येईल, असे यावेळी गोखले यांनी सांगितले. प्रशासनाने गणेश मुर्ती विसर्जित करण्यासाठी जास्त पाणी सोडावे जेणेकरुन सर्व मुर्ती वाहून जाऊन त्याचे विघटन होईल. तसेच प्रशासनाने हिंदूच्या धार्मिक विधींमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यापुर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

आरोग्यविषयक वृत्त –