विधानसभा 2019 : पराभवानंतर पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया !

परळी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीची आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी टफ फाईट होती. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात जनेतचं विशेष लक्ष होतं. त्यापैकीच एक म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे परळीतून विजयी झाले आहेत. धनंजय मुंडेंनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे. यानंतर आता पंकजा मुंडेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एवढ्या मतांनी माझा पराभव होईल अशी मला अपेक्षा नव्हती असे पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

समोर आलेल्या आकडेवारी नुसार 11 व्या फेरीपर्यंत धनंजय मुंडे 18200 मतांनी आघाडीवर होते. परळीत धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.

पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मतदानाचा कल मला मान्य आहे. मला जनतेचा चांगला प्रतिसाद होता. विकासाची कामे आम्ही केली आहेत. त्यामुळे मला हे अपेक्षित नव्हतं. परंतु जनतेचा कौल मला मान्य आहे. यावेळी राजकारणाचा वेगळा चेहरा बघायला मिळाला. त्यांना मताधिक्य मिळालं हे अनाकलनीय आहे. माझ्या पराभवाची पूर्ण जबाबदारी माझी आहे.”

पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या, “पराभव झाला असला तरी लोकांनी मला स्वीकारलं असं समजून मी चालेन. मला पुन्हा संधी दिली जाईल अशी मला अपेक्षा होती.” असं पंकजा यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांमध्ये परळीचा निकाल हा सर्वात धक्कादायक असल्याचं म्हटलं जात आहे.

Visit : Policenama.com