शरद पवारांच्या ‘या’ मागणीमुळं वाढणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘अडचणी’ ?

मुबई : पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याने अनेक मतभेद समोर येत असतात. असेच एक प्रकरण म्हणजे एल्गार परिषद. या प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत नसल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी मागणी शरद पवारांनी आधीच केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे कारण केंद्राचा हा निर्णय पूर्णपणे अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी यास मंजुरी दिल्याचे चुकीचे आहे असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले असल्याने मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो की नाही याबद्दल कायदेशीर सल्ला घेत आहोत आणि गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी देखील स्थापन केली जाऊ शकते, असे त्यांनी संकेत दिले. यानंतर आज सकाळी जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी म्हटले की, भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेची चौकशी ही दोन्ही प्रकरणं वेगवेगळी असून सत्य लपवण्यासाठी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला आणि राज्याकडून तपास काढून घेतला असे स्पष्ट केले आहे.