‘आधी पत्र येतं, मग फडणवीस येतात’ – काँग्रेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार समोर पेच निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पर्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह केंद्रातील मोदी सरकारवर देखील टीका केली.

सचिन सावंत म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वातवरण भाजपकडून जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. ज्या राज्यांमध्ये विरोधकांची सत्ता आहे त्या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडले असल्याचे चित्र निर्माण करायचे. यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन कोणत्या ना कोणत्या प्रकारे सत्ता उलथवून लावयची. साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करुन सरकार पाडायचे उद्योग भाजपकडून केले जात आहे. असे उद्योग मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मागील वर्षी केल्याचे सावंत यांनी सांगितले.

मोदी, शहांनी राजीनामा का दिला नाही ?
पोलिस दलातील एखाद्या अधिकाऱ्याने पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याची ही देशातील पहिलीच घटना नाही. यापूर्वी 2002 मध्ये डी.जी. वंजारा हे गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा दिला होता का ? वंजारा यांच्यासारखाच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केला होता. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता का ? असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

भाजपचे षडयंत्र स्क्रिप्टेड असतं
विरोधी पक्षांच्या सरकारला बदनाम करण्यात भाजपचा हातखंडा आहे. यापूर्वी भाजपने अशा प्रकारची अनेक कारस्थानं रचली आहेत, असा दावा सावंत यांनी केला आहे. भाजपचे षडयंत्र स्क्रिप्टेड असतं. पोलीस आयुक्त पदावरुन दूर झाल्यानंतर परमबीर सिंग पत्र लिहिणार याची भाजपच्या नेत्यांना कल्पना होती. त्यामुळेच पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्याचा आरोप सावंत यांनी केली आहे.