100 कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी अनिल देशमुख यांचे PA कुंदन आणि पालांडे यांना CBI कडून समन्स, तत्कालीन गृहमंत्र्याच्या अडचणीत वाढ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. CBI ने देशमुख यांच्या कुंदन आणि पालांडे या 2 स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या दोघांचे रविवारी सीबीआय जबाब नोंदवणार असून त्यांच्या चौकशीत काय समोर येते याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

NIA च्या ताब्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणामुळे आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. देशमुखांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांची पाठराखण केली.

त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. या आरोपाच्या चौकशीचे उच्च न्यायालयाने आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्रीपद गमवाव्या लागलेल्या देशमुख यांच्याकडे याबाबत येत्या एक, दोन दिवसांत चौकशी करणार आहे. साक्षीदारांकडील तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.