परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी ‘कनेक्शन’?, आरोपानंतर गृह खात्याचे चौकशीचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेल्या आरोपींसोबत कनेक्शन असल्याचा आरोप गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला. डांगे यांनी लेखी तक्रार केल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी गृह खात्याने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. अनुप डांगे यांनी लेखी तक्ररीत म्हटले की, अंडरवर्ल्डशी थेट संबंध असलेले आरोपी जितेंद्र चंदेरलाल नवलानी, भरत शहा, सनी देवान यांच्याशी परमबीर सिंग यांचे कनेक्शन आहे.

2017 मध्ये ब्रिच कँडीजवळ आकृती बिल्डिंगमध्ये असलेल्या ‘डर्टी बर्न्स सोबो’ हा पब रात्री वेळ संपल्यानंतर बंद करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी तिथे जाऊन दिले. त्यावेळी आरोपी जितेंद्र नवलानीशी वाद झाले होते. त्यावेळी परमबीर सिंग अँटिकरप्शनचे महासंचालक होते. त्यांच्याशी घरचे संबंध असल्याचा दावा करत आरोपी नवलानीने डांगे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पबमध्ये असलेल्या काही लोकांमध्ये देखील वाद उद्भवला. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. यश राजू मेहता याने पोलीस हवालदारास मारहाण केली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जितेंद्र नवलानीसह तीन आरोपींना अटक करुन पोलीस ठाण्यात आणले.

आरोपींना पोलिस ठाण्याच आणताच त्यांच्या सुटकेसाठी फोन सुरु झाले. यातील यश मेहता हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलशी संबंध ठेवण्यावरुन अटक झालेला हिरे व्यापारी भरत शहाचा नातू आहे. अनुप डांगे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता एफआयआर दाखल केला. त्यानंतर पहाटे स्वत: भरत शहा पोलीस ठाण्यात आला आणि त्याने नातवाला सोडण्याची विनंती केली. डांगे यांनी याला नकारत देताच भरत शहा, राजीव शहा आणि यश मेहता यांनी डांगे यांच्यावर हल्ला केला. गावदेवी पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार बंदिस्त झाला आहे. या प्रकरणात पोलिस डायरीमध्ये परमबीर सिंग यांचाही उल्लेख आहे.

हे सर्व घडल्यानंतर खासकरून जितेंद्र नवलानीचे नाव आरोपींच्या यादीतून काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी प्रचंड दबाव आणला. 29 फेब्रुवारीला मुंबईचे पोलीस आयुक्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा आणि पोलीस उपायुक्त राजीव जैन यांनी आपल्या कक्षात बोलावून माझे आदेश येईपर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करु नका, असे आदेश परमबीर सिंग यांनी दिले. तसे इलेक्टॉनिक पुरावे असल्याचे डांगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

जितेंद्र नवलानीला आरोपी केल्याच्या मुद्यावरुन सुड उगवत परमबीर सिंग यांनी अनुप डांगे यांना निलंबित केले. या निलंबनाची नष्पक्ष चौकशी करावी आणि अंडरवर्ल्डशी संबध असेलेल्या ऑन रेकॉर्ड पाठीशी घालणाऱ्या परमबीर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी डांगे यांनी गृह खात्याकडे केलेल्या तक्रारीत केली होती. यानंतर तीन महिन्यांनी गृह खात्याने याची दखल घेऊन परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.