परभणी : लाच स्वीकारताना सरपंच, मंडल अधिकारी जाळ्यात

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयाच्या आदेशाने वागदरा शिवारातील शेतीचा फेरफार करण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना राणीसावरगाव मंडलाचे मंडल अधिकारी आणि वागदराचे सरपंच यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

मंडल अधिकारी बालाजी लटपटे आणि वागदरा सरपंच गोविंद सानप अशी त्यांची नावे आहेत. वागदरा येथील तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर असलेल्या शेतीचा तडजोड फेरफार न्यायालयाच्या आदेशाने वडील व चुलत्याच्या नावाने करण्यासाठी अर्ज दिला होता. राणीसावरगावचे मंडल अधिकारी बालाजी लटपटे व वागदरा येथील सरपंच गोविंद सानप यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी करताना तडजोडीअंती १२ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले होते. त्यानंतर लटपटे यांच्या घरी तक्रारदाराकडून १२ हजार ५०० रुपये लाच स्वीकारताना सरपंच सानप यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.