पोलिस दलामध्ये काम करणार्‍या तरूणीची पतीकडून हत्या, स्वतःही केली ‘सुसाईड’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – संतापाच्या भरात पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून करून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात घडली. ही घटना आज दुपारी घडली आहे. डोळ्यासमोरच आई आणि वडिलांचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ अवघ्या दीड वर्षाच्या मुलावर ओढावली आहे. कमल कृष्णा माने असे खून झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर कृष्णा माने याने आत्महत्या केली आहे.

माहितीनुसार, खानापूर फाटा परिसरात रहाणाऱ्या कृष्णा माने याने पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीचा खून केला. आज दुपारी तीनच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं. त्यांच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हेच भांडण टोकाला गेल्याने हा प्रकार घडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कृष्णा माने हा शेती करत होता. तर त्याची पत्नी पोलीस दलात कार्य़रत होती. आज दुपारी काही कामानिमित्त आपल्या मुलाला सोबत घेऊन ते बाहेर गेले होते. पण त्यानंतर घरी आल्यावर दोघांमध्ये वाद झाले. त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. रागाच्या भरात कृष्णाने पत्नी कमलवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णाने देखील आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.