परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – Parbhani News | जिल्हाधिकारी कार्यालयात आवक-जावक विभागात काम करणाऱ्या २४ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. समीर खान (वय-२४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कंत्राटी पदावर कार्यरत असला तरी पोलीस बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता, पण आता त्याची स्वप्नं अपूर्ण राहिली आहेत.
अधिक माहितीनुसार, समीर खान हा जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात ८ वर्षापासून (क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर) या पदावर नियुक्त होता. मागील काही दिवसांपासून तो पोलीस भरतीची तयारी देखील करत होता. सोमवारी (दि.१४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने दुपारच्या वेळेस जवळपास तो मैदानावर पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीची तयारी करत होता.
त्यानंतर अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी परतला. दरदरून घाम येऊन अंग गरम वाटल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचे लग्न दीड वर्षापूर्वीच झाले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, चार महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.