सततच्या Lockdown ला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या, प्रचंड खळबळ

परभणीः पोलीसनामा ऑनलाईन – सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसायात येणा-या अडचणींना कंटाळून जिंतूर (जि. परभणी) शहरातील एका तरुण कापड व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गुरुवारी (दि.1) सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नारायण सदाशिव डोईफोडे (वय 38, रा. जिंतूर ) असे आत्महत्या केलेल्या व्यापा-याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण डोईफोडे हे ग्रामीण भागात जाऊन कापड व्यवसाय करत होते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह होत असे. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय करणे मुश्कील झाले होते. लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे यावर्षीही व्यवसाय होत नसल्याने ते त्रस्त झाले होते. यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी छताला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान डोईफोडे यांच्या नातेवाईकांनी आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मदत मिळत नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, पोलिसांसह महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेतला आहे.