पालक सचिवांनी ‘छावणी’त साधला शेतकऱ्यांशी संवाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी चास, सुपा येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी उपस्थित होते. छावणीतील शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी त्यांच्यासमोरील अडचणी व प्रश्न जाणून घेतले.

श्री.सिंग, म्हणाले, ‘ शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगला सकस चारा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. छावणीत दाखल होणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या जनावरांची छावणी चालकांनी नोंद ठेवावी. जनावरांना शासन निकषानुसार चारा, खुराक द्यावा. पिण्यास लागणारे पाणी उपलब्ध करावे. छावणीतील पशुपालकांची समिती स्थापन करावी. तसेच छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे टॅगिंग करण्याबरोबरच छावणी चालकांनी पशुपालकांना कार्ड वितरीत करावे. छावणीत आग प्रतिबंधक व्यवस्था करावी. ’अशा सूचना देत त्‍यांनी पशुपालकांशी संवाद साधला.

यावेळी चर्चेत शेतकऱ्यांनी काही समस्या पालक सचिवांच्या कानावर घातल्या. छावणी चालकही या संवादात सहभागी झाले होते. शासनाने छावणी चालकांवर लादलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात, वेळेत अनुदान द्यावे आदी विविध समस्या छावणी चालकांनी पालकसचिवांच्या कानावर घातल्या.