सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील तिघांचं आयुष्य संपलं, आई-वडिल आणि मुलीचा बुडून मृत्यू

जयपुर : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफो पहायला मिळतात. तसेच सेल्फीचं काढण्याचं याडंही अनेकांना लागलं आहे. मात्र, सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे पहायला मिळत आहे. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात धरणात पडलेल्या मुलीला वाचवताना आई-वडिलांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना राजस्थानमधील टोंक जिल्ह्यातील उनियारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

उनियारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरणाच्या जवळ सेल्फी घेताना मुलीचा तोल जाऊन मुलगी धरणाच्या पाण्यात पडली. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना तिचे आई-वडीलांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलीस ठाण्याचे अधिकारी राधाकिशन मीना यांनी सांगितले की, गळवा धरणाजवळ सिमेंट रॅम्पच्या उतारावर सेल्फी काढत असताना मुलीचा पाय घसरला आणि ती धरणात पडली. तिला वाचवण्यासाठी आई-वडीलांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली. मुलीला वाचवताना त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

त्यांनी सांगितले की, धरणाजवळ जोडप्याची स्कूटी, दोन मोबाईल, मास्क आणि चप्पल आढळून आले आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून मृत्यू झालेल्यांमध्ये मानसिंग नरुका (वय-45) त्यांची पत्नी संजू कंवर (वय-43) आणि मुलगी लविता उर्फ तनु (वय-17) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.