पालकांनो सावधान…… शालेय विद्यार्थ्यांना होतेय ड्रग विक्री

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन

शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवलीच्या एमएचबी काॅलनी परिसरात समोर आला आहे. सातवी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलांना अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्या विरुद्ध एमएचबी काॅलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
[amazon_link asins=’B00WUGBBGY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43249d68-a5fa-11e8-bb22-edc569a53599′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खासगी रुग्णवाहिका चालक मोहसीन खान सोमवारी एमएचबी काॅलनी परिसरातून जात होता. यावेळी एका रिक्षामध्ये काही मुले अमली पदार्थाची नशा करताना त्याला दिसली. या मुलामध्ये या परिसरातील एका शाळेचे विद्यार्थी होते.

मोहसीन याने तात्काळ याची माहिती मुंबईच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहचताच विद्यार्थ्यांनी मात्र पळ काढला. परंतू अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तिघांना मोहसीन व इतर जागरूक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ताब्यात घेतलेले तिघेही दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी हे अंमली पदार्थ कोठून आणले, ते या पदार्थाची विक्री कशाप्रकारे करायचे, याची चाैकशी पोलिसांनी सुरू केली आहे. भांडुपपाठोपाठ बोरिवलीतही अंमली पदार्थांची खुलेआम विक्री होऊ लागल्याने चिंता वाढू लागली आहे.