पालक संघटना राज्य सरकारवर नाराज ! बारावी परीक्षा रद्द करण्यासाठी पंतप्रधानांना साकडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच तज्ज्ञांनी तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत 12 वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात पालक संघटनांनी ठाकरे सरकारला वांरवार सांगूनही कोणताही सकारात्मक निर्णय होत नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यात हस्तक्षेप करून निर्णयाची मागणी केली आहे. 12 वीच्या ऑफलाइन परीक्षा घेणे सध्यातरी शक्य नाही. तसेच परीक्षांना आणखी उशीर करणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासात ढकलण्यासारखे असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून विद्यार्थी 12 वीच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करत असून आता 10 वीच्या निर्णयाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाचा निर्णय 12 वीच्या परीक्षांच्या बाबतीतही घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनने पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या तर शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसेच व्यावसायिक प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेत अडथळे येणार आहे. शासनाने 12 वीच्या ऑफलाइन परीक्षांना पर्याय शोधून, अंतर्गत मूल्यमापनासाठी एकच केंद्रीभूत निर्णय घेऊन त्यांची मार्गदर्शन नियमावली विद्यापीठ शैक्षणिक संस्थांना द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. ऑफलाइन परीक्षांना पर्याय शोधून त्याप्रमाणे शैक्षणिक संस्था त्यांच्या प्रवेशाच्या नियमावलीत बदल करू शकण्याची परवानगी देता येऊ शकते, तसेच युजीसी त्यासंदर्भात एकसारखी नियमावलीही देऊ शकते, असे पर्याय पालकांनी सुचविले आहेत. याबाबत इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अऩुभा सहाय म्हणाल्या की, कोरोनामुळे बारावीच्या परीक्षेची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी त्यांच्या परीक्षा कशा होतील, ही भीती आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी 12 वीच्या परीक्षा रद्द करावी आणि त्यासाठी पर्यायी अशी ऑनलाईन परीक्षा अथवा अंतर्गत मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी केली आहे.