लहान मुलांच्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे – खा. वंदना चव्हाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुल असलेल्या पालकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी खासदार वंदना चव्हाण यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत केली. गर्भवती आणि स्तनदा मातांचे लसीकरण करण्यासंदर्भातही स्पष्टता आली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होईल, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चर्चा करण्यासाठी काल पुण्याच्या विधानभवनात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार यांनी साप्ताहिक आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्तांनी सद्यस्थिती आणि तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा याच्या नियोजनाबाबत यावेळी माहिती दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार गिरीश बापट तसेच पुणे जिल्ह्यातील आमदार, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापौर आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत खा. वंदना चव्हाण यांनी अनेक उपयुक्त सूचना केल्या. लहान मुलांबाबत प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून ठराविक मार्गदर्शक सूचना सार्वजनिक कराव्यात आणि या मार्गदर्शक सूचनांमध्ये लहान मुलांना देण्यासाठी मोठ्यांप्रमाणे व्हिटॅमिन सी, झिंक किंवा यासह इतर पूरक गोष्टींचा समावेश असावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्या म्हणाल्या, “शासनाने गरीब वर्गातील मुलांना पोषक आहार पुरवावा किंवा स्वयंसेवी संस्थांना यासाठी प्रोत्साहन द्यावे. ० ते १८ वयोगटातील मुलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक व्यायामासंदर्भात मार्गदर्शन करावे. वय वर्षे १८ पर्यंत असलेल्या प्रत्येकाला ‘बालक’ म्हटले जाते, म्हणून या वयोगटातील बालकांमध्ये संसर्ग झाल्यास त्यांचे ० ते १४ वर्षे आणि १४ ते १८ वर्षे असे दोन गट केले जावेत. पहिल्या गटातील मुलावर उपचार करताना त्यांचे पालक सोबत असतील तर दुसऱ्या गटातील बालकांच्या उपचारावेळी पालकांची उपस्थिती वैकल्पिक किंवा मर्यादित असू शकते. तसेच परिस्थितीनुसार यासंबधी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात”.

‘युनिसेफ’ने (UNICEF) ने तयार केलेल्या IEC (Information, Education and Communication) माहिती, शिक्षण आणि संवाद याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुलांसाठी विशेष रुग्णालये ‘child friendly’ सुरू करून त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जावी. मानसोपचार तज्ञ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने वाचन, चित्रकला, संगीत आणि सामुहिक व्यायाम कार्यक्रम राबवले जाऊ शकतात, अशी सूचनाही खा. वंदना चव्हाण यांनी केली. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने घरातील मदतनीस आणि आया यांच्याबाबतही मार्गदर्शनपर उपाययोजना करण्याबाबतही त्यांनी या बैठकीत मागणी केली.