पालकांनी आपल्या मुलांना गोवर-रुबेलाचे लसीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

अकाेला : पाेलीसनामा ऑनलाईन- आरोग्य विभागामार्फत दि. 27 नोव्हेंबर 2018 पासून गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 9 महिने ते 15 वर्षाखालील मुलामुलींना ही लस देण्यात येणार आहे. हे दोन आजार गंभीर असून त्याचे दुष्परिणाम तीव्र स्वरुपाचे आहेत, त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण आवश्यक आहे. ही लसीकरणाची मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. या लसीपासून एकही बालक वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना ‍जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना गोवर-रुबेलाची लस अवश्य देऊन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नियोजन सभागृहात आज गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या नियोजनाबाबत सभा पार पडली. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, महानगर पालिकेचे वैदयकीय अधिकारी डॉ. फारुख शेख आदींसह वैदकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

गोवर-रुबेला लसीकरण हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, ही मोहिम यशस्वी होण्यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करावे. या मोहिमेमध्ये कुठलीही त्रुटी राहू नये. शाळा, मदरसांमध्ये पालकसभा घेऊन या लसीचे महत्त्व पालकांना पटवून दयावे. मोहिमेदरम्यान लसीचा पुरेसा साठा राहिल याची दक्षता घ्यावी. शाळेच्या वेळेत नेमून दिलेल्या टिमने हजर राहावे. मुलांना लस देताना काळजी घ्यावी. या मोहिमेची जास्तीतजास्त प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. शिक्षण विभागाने या मोहिमेत विशेष लक्ष घालून सर्व शाळांतील विदयार्थ्यांना लसीकरण होईल, यासाठी खबरदारी घ्यावी. सर्व संबंधीत यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून मोहिम यशस्वी करावी.

लसीकरण मोहिम राबविताना शंभर टक्के हायजीनचे पालन करावे. या मोहिमे दरम्यान, पालकांना लसीकरण सुरक्षित व फायदयाचे आहे याबाबत जनजागृती करावी, जेणेकरुन आपल्या पाल्यांला गोवर रुबेलांची लसीकरण करुन घेतील. मोहिम शंभर टक्के यशस्वी होईल यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सदर लसीकरण कार्यक्रम चार टप्पयात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात गोवर-रुबेलची लस प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यांत शाळाबाहय विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. तिसऱ्या व चौथ्या टप्यांत शाळेत गैरहजर असलेल्या व इतर 9 महिने ते 15 वर्षाखालील बालकांना ही लस देण्यात येईल. लसीकरणाच्या वेळी बालकांच्या डाव्या हातांच्या अंगठयावर मार्करने खूण करण्यात येईल. त्यानंतर त्यांना लसीकरण बाबतचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

बैठकीत 108 रुग्णवाहिका, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, याचाही आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गरोदर महिलांसाठी महत्त्वाची योजना असून या योजनेचा लाभ महिलांना मिळण्यासाठी दक्षतेने व जबाबदारीने काम करावे. कमीतकमी कालावधीत महिलांना या योजनेतंर्गत आर्थिक लाभ मिळवून दयावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली. यावेळी प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधाबाबत आरोग्य विभागाने काढलेल्या स्टिकरचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी पीसीपीएनडीटीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभांगी खाडे उपस्थित होत्या.