परेश रावल यांनी केला ममतांचा ‘हिसाब बराबर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या देशाच्या राजकारणात वेगवेगळे वाद दिसत आहेत. त्यात पंतप्रधान विरुद्ध सर्व विरोधक असा वाद आहेच. त्यातही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी असलेला वाद ही सध्या चर्चेचा विषय आहे. त्यात भाजप नेते आणि अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या वादावर एक ट्वीट केले आहे.

परेश रावल यांनी केलेल्या या ट्वीट मध्ये एक फोटो आहे. त्याला ‘हिसाब बराबर’ असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोत पंतप्राधन नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी यांची नावे आहेत. त्याला भाग देत त्याचे उत्तर मोदी असं केलं आहे. त्यांच्या ट्वीटवर लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. रावल यांनी योग्यच म्हटल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांनी नेमका कोणता ‘हिसाब बराबर’ केल्याचे अद्याप स्पष्ट नाही.

पश्चिम बंगालचे राज्य सरकार आणि केंद्र सकारमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात वाद सुरु आहेत. चिटफंडप्रकरणी कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी आले होते. त्यांना रोखल्यानंतर बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरु केले, मात्र काही कालावधीतच त्यांनी ते मागे ही घेतले.

ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली होती. तसंच त्यांच्या हेलीकॉप्टरलाही परवानगी दिली नव्हती. तर योगींनीही ही बंदी झुगारत पुरुलिया येथे सभा घेतली. त्याच सभेत त्यांनी ममता बॅनर्जींवर टीकाही केली होती. तर मोदींही पश्चिम बंगालमध्ये सभा घेत त्यांच्या सभेला तुडुंब गर्दी आणि लोकांचा प्रतिसाद असल्याचे दाखवून दिले होते.