Pariksha Pe Charcha 2020 : ‘तणाव मुक्त राहण्यासाठी वेळेला महत्व द्या’, PM मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, जाणून घ्या खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामधील तणाव दूर करण्यासाठी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम वर ‘परीक्षा पे चर्चा’ केली. पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसमोर एक पीएम म्हणून नाही तर मित्र म्हणून चर्चा करत होते. त्यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की आज पुन्हा एकदा आपला मित्र आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या समोर आला आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, या चर्चेतून तुमच्या आई वडिलांचा तणाव दूर होणार आणि तो उद्देश घेऊनच मी आपल्यासमोर आलो आहे.

पीएम मोदींनी मुलांना २०२० या दशकाचे महत्त्व सांगितले –

पीएम मोदींनी मुलांना २०२० या दशकाचे महत्त्व सांगताना म्हटले की, हे दशक भारतासाठी खूप महत्वाचे असून या दशकात देश जी काही प्रगती करणार यात १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान असणार आहे. तसेच मोदींनी सांगितले की, हे दशक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून देशाला खूप उंचीवर नेणारे ठरणार अशी अपेक्षा करू आणि यामध्ये सर्वात जास्त योगदान या पिढीचेच असणार आहे.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले – का होतो मुडऑफ ?

पंतप्रधान म्हणाले की, आपण कधी विचार केला आहे की मुडऑफ का होतो? आपल्या स्वत:मुळे वा बाहेरच्या दुसऱ्या कारणांमुळे? जर आपण नीट विचार केला तर हे निदर्शनास येईल की जास्त करून मुडऑफ हा बाहेरील काही कारणास्तव होत असतो, पंतप्रधान म्हणाले की, आपण अपयशात देखील यशाचे धडे घेऊ शकतो. प्रत्येक प्रयत्नात आपण उत्साह भरू शकतो आणि एखाद्या गोष्टीत जर आपल्याला अपयश आले तर त्याचा अर्थ असतो की आपली यशाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

पीएम मोदी यांनी द्रविड-लक्ष्मण यांचा उल्लेख केला –

मोदी म्हणाले की, आपल्याला २००१ मधील भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका आठवते का? आपला क्रिकेट संघ अपयशाला सामोरे जात होता. मूड फारसा चांगला नव्हता. पण, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी त्यावेळी जे केले ते आपण कधी विसरू शकत नाही. त्यांनी मॅच ला वेगळी दिशा देऊन संघाला विजयी केले होते.

फक्त परीक्षेतील गुण आपले भविष्य नाही –

पीएम मोदी म्हणाले की, फक्त परीक्षेतील गुण आपले भविष्य ठरवत नसतात. ते म्हणाले की, अनावधानाने आपण त्या दिशेने जात आहोत जिथे यश-अपयश चा मुख्य बिंदू म्हणजे परीक्षेतील गुण बनले आहेत. त्यामुळे मनात फक्त जास्त गुण कसे प्राप्त करता येतील याकडे लक्ष असते, बाकी सर्व नंतर अशी भूमिका सर्वांची असते. फक्त परीक्षेत गुण मिळवणे हे काही भविष्य नसते, कोणती एक परीक्षा आपले भविष्य ठरवू शकत नाही. ही एक महत्वपूर्ण पायरी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना मी सांगू इच्छितो की सर्व काही परीक्षाच आहे असे मुलांना सांगू नये.

फेसबुक पेज लाईक करा –