पॅरिसमध्ये हल्लेखोराने कापला शिक्षकाचा गळा, राष्ट्रपती म्हणाले – ‘हा इस्लामिक अतेरिकी हल्ला’

फ्रान्स : वृत्तसंस्था – फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये एका तरुणाने शिक्षकावर हल्ला करत शिक्षकाचा गळा कापला. हा प्रकार शुक्रवारी घडला. तरुणाने शिक्षकावर हल्ला करत चाकूने शिक्षकाचे शीर धडा वेगळे केले. या घटनेमुळे संपूर्ण पॅरिसमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये हल्लेखोराचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पॅरिसच्या पूर्व-पश्चिम भागातील कन्फ्लाक्स सेंट-होनोरिन नावाच्या शाळेजवळ घडली. या घटनेबाबत बोलताना फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी म्हटले आहे की, हा इस्लामिक दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला फ्रान्सच्या राजधानीच्या मध्यभागापासून वायव्य उपनगराच्या कन्फ्लान्स सेंट होनोरियन येथे असलेल्या शाळेजवळ संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्याचा प्रयत्न केला पण नंतर गोळीबार करण्यात आला. अद्याप हल्लेखोराचे नाव जाहीर झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हा 18 वर्षाचा तरुण होता. त्याने ज्या शिक्षकाची हत्या केली त्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना पैगंबर मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र दाखवले होते. हे व्यंगचित्र फ्रेच मासिक शार्ली अब्दोमध्ये प्रसिद्ध झाले होते. हल्ला करणाऱ्या तरुणाचे ओळखपत्र सापडले असून त्याचा जन्म 2002 मध्ये मॉस्को येथे झाल्याचे समोर आले आहे.

हल्ल्यामध्ये मृत्यू झालेले शिक्षक हे इतिहास हा विषय शिकवत होते. काही दिवसांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वर्गाच्या चर्चेत भाग म्हणून मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखवले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.