जामियामध्ये ‘फायरिंग’ करणाऱ्याला पैसा कुणी पुरवला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान अल्पवयीन तरुणाने गोळीबार केला. या घटनेत एक विद्यार्थी जखमी झाला. याच घटनेच्या मुद्दावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राहुल गांधी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी जामियामध्ये गोळीबार करणाऱ्याला पैसा कुणी पुरवला ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जामिया परिसरात 17 वर्षीय तरुणाने गुरुवारी दुपारी आंदोलकांकडे बंदूक रोखून गोळीबार केला. तो सातत्याने ‘यह लो आझादी’ असे म्हणत होता.’देश मे जो रहेना होगा, वंदे मातरम् कहा होगा’ आणि ‘दिल्ली पोलीस जिंदाबाद’ अशा घोषणा या तरुणाने दिल्या. गोळीबार करण्याआधी या तरुणाने घोषणा दिल्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा मुद्दा उपस्थित केला आहे.

महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जामियाच्या विद्यार्थ्यांनी राजघाटपर्यंत शांतता मोर्चा काढण्यात आला. सीएए आणि एनआरसी विरोधात जामियाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आंदोलन सुरु केले. त्यानंतर ते देशभर पसरले आणि जामियापासून काही अंतरावर असलेल्या शाहीन बाग हा परिसर आंदोलनाचा केंद्रबिंदू बनला आहे. जामिया विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चा दरम्यान पोलीस आणि शीघ्र कृती दलाचा ताफा तैनात असताना हिंसाचाराची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.