संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून, चीन संघर्षांवर चर्चेची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. भारत-चीन यांच्यातील सध्याच्या घडामोडींवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली असून, केंद्र सरकारकडून संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिले जाण्याची शक्यता आहे. चीनशी संघर्ष, सीमांवरील सद्यस्थिती, कोरोना साथरोगाची हाताळणी, देशाची आर्थिक स्थिती, छोट्या उद्योगांची बिकट अवस्था, विमानतळांचे खासगीकरण, पर्यावरणीय प्रभावाचा नवा मसुदा या प्रमुख विषयांवर लोकसभेत व राज्यसभेत चच्रेची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.

संसदेच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चीन संघर्षांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ राखून ठेवण्याची सूचना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. त्यावर, हा मुद्दा संवेदनशील असून, मंगळवारी विविध पक्षांच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यानंतर चच्रेसंदर्भात केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल, असे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना सांगितले. कुठल्याही विषयावर चर्चा करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजपासून लोकसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 1 आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत होईल. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार व रविवारसह सलग 18 दिवस होणार आहे.