‘फायनान्स विधेयक’ 2020 मध्ये 40 हून अधिक दुरूस्त्या, पेन्शन फंडांवर मिळला ‘दिलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाव्हायरसमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही वादविवादाशिवाय वित्त विधेयक (फायनान्स बिल, २०२०) सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर कर तज्ज्ञांनी त्याचे स्वागत केले आहे. या विधेयकात अर्थसंकल्पात प्रस्तावित नियमांमधील अंमलबजावणी, हटविणे, कपात, वाढ किंवा इतर बदलांची सविस्तर माहिती आहे. वित्त विधेयकात ४० हून अधिक दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. दोन्ही सभागृहात वित्त विधेयक २०२० मंजूर झाल्यानंतर कर तज्ज्ञ दिनेश कनाबर म्हणाले की, पेन्शन फंड आणि टीसीएसवरील कर सवलत यासारख्या निर्णयाचे स्वागत आहे.

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लोकसभेत वित्त विधेयक मांडले जाते. सोमवारी दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ एप्रिल रोजी संपणार होते. परंतु कोरोना विषाणूची तीव्रता पाहता हे केले गेले आहे.

सर्वपक्षीय बैठकीत पास करण्याचा निर्णय
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की सर्वपक्षीय बैठकीत कोरोना विषाणूमुळे कोणत्याही विवादाशिवाय हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे विधेयक संसदेत सादर केले तेव्हा कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि डीएमके नेते टी आर बाळू म्हणाले की, कोरोना विषाणूचा विचार करता विविध क्षेत्रांना आर्थिक पॅकेजेस दिली जावीत.