राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे ‘ते’ नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे शिवसेनेचे पक्षांतर केलेले पाच नगरसेवक पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या हे सर्व नगरसेवक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहचले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे सर्व नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर घेऊन गेले आहेत.

दरम्यान, सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात ही भेट घडवून आणली. अजीत पवार, पाच नगरसेवक, हसन मुश्रीफ यांच्यात अर्धा तासापेक्षा अधिक वेळ चर्चा झाली. पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरु झाल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत गेलेल्या पाचही नगरसेवकांनी घरवापसीचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

अन्यथा राजीनामे देऊ, 5 नगरसेवकांचा निर्णय

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरसेवक पुन्हा शिवसेनेत पाठविण्याचा निरोप देण्यात आल्याची बातमी समजली होती. मात्र, असं असलं तरी आम्ही शिवसेनेत जाणार नाही वेळ पडल्यास आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देऊ असा इशारा पारनेर नगर पंचायतीच्या त्या पाचही नगरसेवकांनी दिला आहे. यावर आज राष्ट्रवादी आणि वेळ पडल्यास मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.
पारनेरमधील पाच नगरसेवकांना शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये अजीत पवारांच्या उपस्थित प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन सुरुंग लावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात होते. मात्र, वास्तविक पाहता आम्ही शिवसेना पक्षावर किंवा पक्ष प्रमुखांवर नाराज नसून स्थानिक नेतृत्वामुळे आम्ही राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाचही नगरसेवकांनी दिली. पारनेर शिवसेनेत असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तथा माजी आमदार विजय औटि यांची हुकूमशाहीला राजरोसपणे सुरु होती. आम्ही नगरसेवक असतांना देखील आम्हाला शिपायाची वागणूक दिली जात असल्याची धक्कादायक माहिती नगरसेवकांनी बोलताना दिली.