निघोज प्रकरण : काका, मामाला गुन्ह्यातून वगळण्याचा तपासी अधिकाऱ्यांचा न्यायालयात अहवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर तालुक्यातील निघोज येथील रुख्मिणी रणसिंग हिची हत्या ‘ऑनर किलिंग’ नसून, तिचा खून केला आहे, या निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले तिचे वडील, काका व मामा यांना सीआरपीसी १६९ प्रमाणे पुण्यातून वगळावे, असा अहवाल पोलिसांच्यावतीने आज सायंकाळी पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

मयत रुक्मिणी हिच्या मृत्युपूर्व जबाबानुसार पारनेर पोलिसांनी आंतरजातीय विवाहातून तिला पेटवून दिल्याप्रकरणी काका व मामाला अटक केली होती. तसेच वडिलांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याने अटकेची कार्यवाही करण्यात आली नव्हती. प्रथमदर्शनी हा प्रकार ‘ऑनर किलिंग’ असल्याचे वाटले. मात्र पोलिसांनी दिलेल्या तपासात धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रुख्मिणी हिचा खून ‘ऑनर किलिंग’ नसून पती मंगेश रणसिंग यानेच तिची हत्या केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे.

याबाबत पोलिसांनी मयत रुख्मिणीचा सहा वर्षांचा भाऊ नंचू, मंगेश याला पेट्रोलची बाटली घेऊन जाताना पाहणारे साक्षीदार व घराचा दरवाजा उघडणारे अशा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पारनेर येथील न्यायालयासमोर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १६४ प्रमाणे नोंदविले आहेत. त्यानुसार रुख्मिणीचा खून तिच्या पतीनेच केल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून अटक केलेल्या तिघांनाही वगळून तिच्या पतीला अटक केले जाणार आहे. निघोजची घटना ‘ऑनर किलिंग’ नसून पतीनेच पत्नीचे हत्या केली, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला मंगेश रणसिंग याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अटक केली जाणार आहे.