राफेल प्रकरणाची फाईल पर्रिकरांकडेच असल्याचा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राफेल डीलवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरकार व विरोधीपक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राफेल प्रकरणाची फाईल शंभर टक्के पर्रिकरांकडेच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच गोव्यातील सत्तेतून पर्रिकरांना हटवण्यात येऊ नये यासाठी मोदींवर दबाब टाकण्यात आला असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

राफेल काराराची फाईल आपल्या बेडरुममध्ये असल्याचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे वाक्य म्हणजे पंतप्रधानांना दिलेली धमकी होती, असा दावा करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘राफेल प्रकरणाची फाईल आपल्याकडे असल्याचा पर्रिकरांनी आपल्या मंत्रीमंडळासमोर केलेला दावा हा पंतप्रधानांवर केलेला गंभीर आरोप आहे. कारण, गोव्यातील सत्तेतून पर्रिकरांना हटवण्यात येऊ नये यासाठी त्यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर दबाव टाकण्यात आला त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.’

राफेलची फाईल पर्रिकरांकडेच –

राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने प्रामाणिकपणे चौकशी केल्यास किंवा संयुक्त संसदीय समितीसमोर याची चौकशी झाल्यास सत्य नक्कीच समोर येईल. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी प्रामाणिक नाही कारण राफेलप्रकरणी ज्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या मूळ प्रश्नावर कोर्टाने उत्तरच दिलेले नाही. किंमतीबाबतच घोटाळा झालेला असताना सुप्रीम कोर्ट म्हणते की किंमतीबाबत आम्ही निर्णय देणार नाही. मात्र, असं कसं होऊ शकेल? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.जर राफेल प्रकरणाची मूळ फाईल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे असल्याचे सरकार सांगत आहे. तर या फाईलमधील एक एक कागद समोर कसा येत आहे, असा सवाल करताना ही फाईल शंभर टक्के पर्रिकरांकडेच असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. याबाबत काही लोकांशी आपलं बोलण झालं असून त्यांनीच ही माहिती आपल्याला दिल्याचे चव्हाण म्हणाले.

मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये राफेलच्या सर्व फाईल्स : काँग्रेस

राफेल घोटाळ्याचे रहस्य मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे यांची ऑडिओ क्लिप सादर केली होती. यात राणे हे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या बेडरूममध्ये राफेल घोटाळ्याशी संबंधित माहिती असल्याचे सांगत आहेत. मला कोणीही काही करू शकत नाही.माझ्याकडे राफेल घोटाळ्याची माहिती आहे. माझ्या घरातील बेडरूमध्ये यासंबंधित कागदपत्रे आहेत असे पर्रिकर म्हणाल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. पर्रिकरांकडे राफेल घोटाळ्याशी संबंधित मोठी माहिती आहे. ती समोर आलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती.