पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन अजित पवारांचे मोठे विधान

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची मावळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर सुचक विधान केले आहे. अजित पवार यांनी आज (बुधवार) मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहिर होईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पनवेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते.

मी पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४८ जागा निवडून याव्या यासाठी आलो असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. तसेच जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्तापार्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे जातात. आता बाकीच्या बद्दलची चर्चा सुरु असून एक दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल असेही अजित पवार म्हणाले.

भाजपा सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नोटाबंदी, शेतकरी कर्जमाफी, महागाई हे विषय लावून धरण्यास सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना काँग्रेस न सोडण्याचा सल्ला दिला होता , असंही अजित पवार म्हणाले आहेत. मागील आठवडाभरापासून पार्थ पवार हे पनवेल, उरण मतदारसंघात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मोठी घोषणा केली. पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी, अशी सर्वांची इच्छा आहे. या मतदार संघात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही तशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले.